आमच्याविषयी



प्रतिष्ठानविषयी माहिती
दिनांक २८ ऑगस्ट १९९० रोजी कवयित्री संजीवनी खोजे ने जगाचा निरोप घेतला. तिने शालेय जीवनातच काव्य निर्मितीस आरंभ केला. कविताबरोबरच ललित लेखनातही प्राविण्य मिळविल्याने अनेक दिवाळी अंकात, दैनिकात, कविता आणि लेख प्रसिद्ध झाले. वयाच्या एकविसाव्या वर्षी "एकोल" हा पहिला काव्यसंग्रह कविवर्य श्री नारायण सुर्वे यांच्या हस्ते प्रकाशित केला. या काव्यसंग्रहास महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अनुदान मिळाले होते. दिनांक २८/०८/१९९० रोजी संजीवनीने आपली जीवनयात्रा संपवली व बरोबर तीन महिन्यांनी म्हणजे २८/११/१९९० रोजी तिच्या "एकोल" काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा मराठी वाड्मय निर्मितीचा प्रथम पुरस्कार मिळाला .

कवयित्री संजीवनी स्वतः कविता लिहिण्याव्यातिरिक्त कवी संमेलनाचे संयोजन देखील करीत असे. मध्ये मध्ये कवितांच्या ओळी पेरीत कवी संमेलनात सुत्रसंचालन ही करीत असे. प्रत्येक कविसंमेलनात तिचा सक्रीय सहभाग असे. नगरच्या साहित्य क्षेत्रात तिने नवचैतन्य निर्माण केले होते. 'ओवी' नावाचे अनियतकालिक स्वतः आर्थिक झळ सोसून सुरु केले. स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करूनही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कवी संमेलनासाठी जाऊन आली. शाळा - कोलेजात होणाऱ्या कावि संमेलनास परीक्षक म्हणूनही तिने अनेकवेळा जबाबदारी पार पडली. तसेच नाटकात भाग घेऊन अनेक नाटकांचे दिग्दर्शनही केले आहे.

कै.संजीवनीने अल्पवयात साहित्य क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा विचार करून अहमदनगर नगरपालिकेने संजीवनीच्या पहिल्याच स्मृतीदिनी दिल्लीगेट ते बागरोजा हडको या मार्गास "कै.संजीवनी खोजे पथ" असे नाव दिले. सर्वश्री ना.धो.महानोर, महावीर जोंधळे, नारायण सुर्वे, रामदास फुटाणे, फ.मु.शिंदे, कै.दया पवार, श्रीमती शांता शेळके इत्यादी मान्यवरांनी संजीवनीच्या कार्याची प्रशंसा केली आहे. संजीवनीच्या अप्रकाहित कवितांचा काव्यसंग्रह "पैलतीर" तिच्या पहिल्या स्मृतीदिनी जेष्ठ कविवर्य नारायण सुर्वे यांचे हस्ते प्रकाशित झाला. संजीवनीने तन, मन, धनाने साहित्य क्षेत्रात केलेली सेवा विचारात घेऊन संजीवनी खोजे मित्र मंडळ दरवर्षी २८ ऑगस्टला संजीवनीचा स्मृतीदिन साजरा करीत आहे. या कार्यक्रमात श्री. रामदास फुटाणे यांचा दरवर्षी सक्रीय सहभाग असतो. या स्मृति दिनाच्या निमित्तने दरवर्षी एका उत्कृष्ट काव्यसंग्रहास रु. ३००१ /- चा रोख पुरस्कार व मानचिन्ह देण्यात येते. याचं दिवशी कविसंमेलन व काव्यस्पर्धा घेतल्या जातात. आत्तापर्यंत २१ काव्यसंग्रहास पुरस्कार दिलेले आहेत. अह्मानागारची साहित्य चळवळ वाढावी, महाराष्ट्रातले नामवंत साहित्यिक शहरामध्ये कार्यक्रमाच्या निमित्ताने यावेत ही तिची मनस्वी इच्छा होती. व त्याचीच संकल्पपूर्ती करण्यासाठी संजीवनी खोजे मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी, गेली एकवीस वर्ष हा कार्यक्रम आयोजित केला जातो. आतापर्यंत महाराष्ट्र, आणि महाराष्ट्राच्या बाहेरून गोवा, मध्यप्रदेश, इंदूर, आंध्रप्रदेश इत्यादी राज्यातूनही पुरस्कारासाठी काव्यसंग्रह प्राप्त झाले आहेत. सध्याचे हे बाविसावे वर्ष असून चालू वर्षी अहमदनगर च्या श्री गणेश मरकड यांच्या कुणब्याच गानं या काव्यसंग्रहास पुरस्कार जाहीर झाला आहे.

आजपर्यंत झालेल्या पुरस्कार सोहळ्यास जेष्ठ कवी ग्रेस, अशोक नायगावकर, डॉ. भालचंद्र नेमाडे, डॉ. रा.ग.जाधव, फ मु. शिंदे, कै.डॉ.र.बां. मंचरकर, माजी आमदार यशवंतराव गडाख, महेश केळूसकर, चंद्रशेखर गोखले, दत्ता भगत, रंगनाथ पठारे, अनंत दीक्षित, प्रा.डॉ.वि.भा. देशपांडे, कै. निळू फुले इत्यादी मान्यवरांनी अध्यक्षस्थान भूषविले आहे.

1 टिप्पणी(ण्या):

  1. झक्कास प्रकल्प आहे तुमचा, पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी तुम्हास शुभेच्छा , जय महाराष्ट्र #

    उत्तर द्याहटवा